व्यक्तिमत्व संजीवनी

personality

“माणुस घडला तर सर्व काही घडू शकते, माणुस बिघडला तर सर्व काही बिघडते.
माणुस दुरुस्त झाला तर सर्व काही दुरुस्त होऊ शकते.”
– डॉ वाय के शिंदे

व्यक्तीकडे अनेक गुण असतात. त्यापैकी अनेक गुण एकत्र येऊन काही गुण वैशिष्टे बनतात. माणुस आयुष्यात यशस्वी व आनंदी होण्यासाठी खालील गुण- वैशिष्टे आवश्यक आहेत:

१. आत्मप्रतिमा
ज्या व्यक्ती स्वतःला ओळखू शकतात त्याच व्यक्ती इतरांना ओळखू शकतात. स्वतःची ओळख करून घेण्याची तीव्र जिज्ञासा पूर्वकुमार अवस्थेत निर्माण होते. स्वतःची योग्यता – अयोग्यता तपासून मनातल्या मनात स्वतःचे मानसिक चित्र तयार करते त्यास ‘आत्मप्रतिमा’ म्हणतात. स्वतःचे मूल्यमापन किंवा आत्मपरीक्षण जितके तंतोतंत, अचूक, स्पष्ट व यथार्थ तितकी आत्मप्रतिमा निकोप किंवा अतिउत्तम होय.
सर्व प्रकारच्या विकासावस्था गाठण्याचे व त्यांचे सुसंघटन आत्मप्रतिमा करते. आत्मप्रतिमा जर स्वच्छ, निकोप व सुस्पष्ट असेल तर विकासाची दिशा निश्चित करणे सुलभ होते. महत्त्वाकांक्षा निवडण्याचे काम आत्मप्रतिमाच करीत असते. व्यक्ती जीवनात यशस्वी कि अयशस्वी हे व्यक्तीच्या आत्मप्रतिमेवरून ठरविता येते. आत्मप्रतिमेत झालेला बिघाड दुरुस्त करून ‘निकोप’ आत्मप्रतिमा घडविण्यात कुमारवयाचा कालावधी अत्यंत महत्वाचा असतो. कुमारअवस्थेतच आत्मप्रतिमा निकोप असेल तर संपूर्ण जीवनाचे सार्थक होते. विधायक दृष्टीकोन प्राप्त होतो. कुमारअवस्थेत उत्तम आत्मप्रतिमेच्या फळझाडाची लागण केली तर प्रौढावस्थेत उत्तम फळे लागतील.

२. महत्त्वाकांक्षा
‘आपण काय करू शकतो ?’ असा विचार करणे म्हणजेच महत्त्वाकांक्षा ठरविणे होय. आपल्या कुवतीचा आणि सामर्थ्याचा अंदाज घेऊन आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची महत्वाची अशी तीव्र आकांक्षा म्हणजे ‘महत्त्वाकांक्षा’. व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाकांक्षा ही दिशायुक्त प्रेरणा देण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य करीत असते. महत्त्वाकांक्षा केवळ बाळगून पूर्ण होत नाहीत. तर निश्चित दिशेने कष्टसाध्य प्रयत्नांचे व दिर्घोद्योगाचा डोंगर उभा करून टप्प्याटप्प्याने यशाची शिखरे गाठली तरच महत्त्वाकांक्षा पूर्ण होत असते.
जीवनध्येयाच्या मार्गातील विकासाचे महत्वाचे विकासाचे टप्पे म्हणजे महत्त्वाकांक्षा. जीवनध्येय निश्चित झाले कि त्या मार्गातील महत्त्वाकांक्षा क्रमशः निश्चित करता येऊ शकतात. महत्त्वाकांक्षा प्रगतीची दिशा निश्चित करते. दिशायुक्त प्रेरणा लाभून व्यक्ती जीवनात यशस्वी होते. अवघड गोष्टी सोप्या करण्याचे तंत्र आत्मसात झाले तरच आपणास आपली महत्त्वाकांक्षा निश्चित करत येईल. जीवनाचे गणितसुद्धा अश्या व्यक्तींना सहजपणे सुटते. जशी आत्मप्रतिमा असते तशी महत्त्वाकांक्षा असते. वैचारिक व नैतिक पातळीवरच महत्त्वाकांक्षा ठरते. ‘मनात तयार झालेला स्वयंस्फूर्त व पक्का शुभसंकल्प म्हणजे महत्त्वाकांक्षा.’

३. आत्मविश्वास
माणसाने आत्माविश्वासाच्या बळावर मानसिक व बौद्धिक क्षमतांचा प्रचंड प्रमाणात उपयोग करून अपेक्षा केली नव्हती इतके सामर्थ्य वाढविले. पण तो आज परत आत्मविश्वास गमावून बसला आहे. आत्मविश्वास मिळवण्याचे सुद्धा एक तंत्र आहे आणि ते आत्मसात करणे माणसाला शक्य आहे.
‘श्रद्धा’ ही आत्मविश्वासाची सर्वश्रेष्ठ अवस्था होय. स्वतःच्या सामर्थ्यावर ज्याची अढळ श्रद्धा आहे त्याला जगातली कोणतीही शक्ती महत्त्वाकांक्षेच्या मार्गातून माघारी फिरवू शकत नाही. म्हणूनच कोणतेही मार्गदर्शन नसताना एकलव्य श्रद्धेच्या बळावर अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी ठरला. मानसिक सामर्थ्याच्या बळावर अपंग व्यक्तीदेखील यशाचे शिखर गाठू शकते. माणसाकडे शेकडो प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता असतात. त्यापैकी एका क्षमतेचा व त्यासंबंधित कौशल्याचा विकास घडविला तर जीवनाचे कल्याण होऊ शकते.आत्मविश्वास जाणीवपूर्वक प्राप्त करावा लागतो. आत्मविश्वासाचे अत्युच्च टोक म्हणजे ‘आत्मश्रद्धा’. जबरदस्त इच्छाशक्तीला केवळ आत्मविश्वासच फळे मिळवून देत असतो. सूर्याप्रमाणे आत्मविश्वास स्वयंप्रकाशित असतो. जीवनातील श्रेष्ठ दर्जाचे, त्रिभुवन कीर्तीचे किंवा अलौकिक यश माणसाला अचाट साहस व आत्मश्रद्धेशिवाय लाभू शकत नाही. स्वतःला संपूर्णतः झोकून दिल्याशिवाय ही अवस्था प्राप्त होत नाही.

४. निर्णयक्षमता
जीवनातील कोणत्याही प्रसंगी परिणाम, फलनिष्पत्ती याचा अंदाज घेऊन आचार, विचार व कृती या माध्यमातून दिशा निश्चित करण्याची प्रेरणाशक्ती म्हणजे ‘निर्णयशक्ती’ होय. जीवनातील प्रत्येक प्रसंगी व्यक्तीला जे यश-अपयश प्राप्त होत असते त्यातूनच त्या व्यक्तीची निर्णयशक्ती आकार घेत असते. निर्णयशक्तीसाठी सुसंस्कार, विधायकवृत्ती व आत्मसंयमन या गुणवैशिष्ट्यांची गरज आहे. यशाचा निश्चित मार्ग दर्शवणारी शक्ती निर्णयशक्ती. पालकांनी मुलांचे निर्णय स्वतः न घेता मुलांनी स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.स्वतंत्रपणे विचार करण्याच्या स्वयंप्रेरणेतून व स्वयंअध्यापनवृत्तीतून निर्णयशक्तीचा उगम होत असतो. भविष्यकाळात पर्याय विपुलतेमुळे आपणांस साधे साधे निर्णय घेत येणार नाहीत. मुलांच्या अंगी निर्णयशक्ती कशी निर्माण होईल, अशा प्रकारचे संस्कारमाध्यम तयार करणे हे राष्ट्रापुढील महत्वाचे आव्हान ठरणार आहे. वैचारिक पातळीवर घेतलेल्या निर्णयापेक्षा नैतिक पातळीवर घेतलेला निर्णय अधिक श्रेष्ठ असतात. भूतकाळाचे वर्णन करण्यात आपली शक्ती खर्च न करता भविष्यकालीन समस्या काय असतील याचा विचार करून घेतलेले निर्णय अधिक शहाणपणाचे ठरतात. निर्णयशक्तीचा सर्वश्रेष्ठ आविष्कार म्हणजे ‘दिव्यदृष्टी’.

५. सर्जनशीलता
मानवाच्या प्रचंड प्रगतीचे सर्व रहस्य सर्जनशीलतेमध्येच आहे. कारण सर्जनशीलतेचा स्थायीभाव ‘नवनिर्मिती’ होय. स्वतंत्र विचारशक्ती, नवनिर्मिती, कल्पकता, विविधता, लवचिकता, विचारप्रवाहित्व, संवेदनशीलता, पुनर्स्थापना, मौलिकता इ. वैशिष्ट्यांचा समावेश सर्जनशीलतेत होतो. आपणांस काहीतरी वेगळे करायचे अशी भावना त्यांत असते. सर्जनशीलता एक टक्का व नव्याण्णव टक्के परिश्रम असतील तरच सर्जनशील निर्मिती होते. अतिउत्कृष्टतेकडे जाण्याची सतत ओढ असेल तरच सर्जनशीलतेचा मार्ग खुला होतो. ज्या गोष्टीचे वेड लागते त्यासंबंधित सतत निरीक्षण, अवलोकन, वाचन, मनन, चिंतन, एकाग्रता यांचे सातत्य व परिश्रम घेण्याची तयारी असेल तरच सर्जाशील विचार प्रक्रिया सुरु होतात.
सर्जनशील मुले हि राष्ट्राची अतिमौल्यवान संपत्ती होय. सर्जनशील मुलांचा योग्य विकास झाला तर नवनिर्मिती घडवून राष्ट्राचे सामर्थ्य वाढवू शकतात. अशा प्रकारची मुले विलक्षण हिकमती, खटाटोपी, धाडसी व शोधक वृत्तीची असतात. योग्य विकास झाला तर काहीतरी दिव्यभव्य करू शकतात. जपानच्या क्रांतिकारक प्रगतीचे रहस्य म्हणजे त्यांनी सर्जनशीलतेला दिलेले महत्व. मुलाला जन्म दिल्यावर प्रथमतः माता ज्या उत्कटतेने त्याच्याकडे पाहते तशाच स्वरूपाचा वेगळा आनंद नवनिर्मितीचा असतो. सर्जनशीलता प्राप्त करून घेणे म्हणजे सर्वश्रेष्ठ सिद्धी प्राप्त करून घेणे होय. सर्जनशीलता प्रसन्न होणे म्हणजे प्रत्यक्ष सरस्वती व लक्ष्मी प्रसन्न होऊन वैभव प्राप्त होणे. सर्वश्रेष्ठ क्षमतेचा आविष्कार सुद्धा सर्वश्रेष्ठच असणार यात शंका नाही.

६. अभिव्यक्ती
व्यक्तिमत्वाचा कोणत्याही माध्यमातून केलेला आविष्कार म्हणजे अभिव्यक्ती. आपल्या सूक्ष्म क्षमता, कौशल्य व वृत्ती यांचे उपयोजन करण्याच्या दृष्टीने केलेली प्रत्यक्ष कृती म्हणजेच ‘अभिव्यक्ती’. आपणाकडे केवळ चांगल्या क्षमता, चांगली कौशल्ये व चांगल्या वृत्ती असून चालत नाही त्याचबरोबर अभिव्यक्ती असेल तरच महत्त्वाकांक्षा गाठता येते. सर्जनशीलतेचे व्यक्त झालेले रूप म्हणजे अभिव्यक्ती. व्यक्तीकडे आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्ती असेल तरच यश प्राप्त होते. आत्मविश्वासापूर्ण अभिव्यक्ती असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात तेज स्पष्ट जाणवते. अभिव्यक्तीचा दर्जा प्रयत्नाने, सरावाने व कष्टसाध्य साधना करून वाढविता येतो. जीवनात यश संपादन करण्याचा क्षण ज्यावेळी येतो त्याच वेळी ‘आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्तीची’ प्रचीती येते.

७. समस्या विमोचन
जीवनध्येयाचा किंवा महत्वाकांक्षेच्या मार्गातील असंख्य समस्यांना, अडचणींना व अडथळ्यांना तोंड देऊन मार्ग काढण्याची किंवा समस्या सोडविण्याची क्षमता म्हणजे ‘समस्याविमोचन’. ज्यांची संवेदनशीलता चांगली असते त्यांनाच परिस्थितीचे लवकर आकलन त्वरित होऊन समस्या चटकन ओळखता येतात. ज्यांना समस्या कळतात त्यांनाच त्या सोडविता येतात. समस्यांचा महात्वक्रम लक्षात घेऊन समस्या सोडविण्याचा क्रम निश्चित करावा.अतिउत्तम निर्णयशक्ती समस्या विमोचनात दिशादर्शक म्हणून उपयुक्त ठरते. सर्जनशील विचाराने समस्या विमोचन तर होतेच, त्याचबरोबर प्रसंगी त्यातून नवनिर्मितीसुद्धा होऊ शक्ते. सतत मनन व चिंतन करून परिस्थितीचा अभ्यास करण्याची वृत्ती व तळमळ असेल तरच समस्या ओळखता येतात व सोडविता येतात.

८. स्वयंअध्ययन वृत्ती
माणसाच्या आचार, विचार व कृतीत सतत परिवर्तन घडवून विकासाच्या दिशेने जाण्यास प्रवृत्त करणारी स्वयंप्रेरित विकास प्रक्रिया म्हणजे ‘स्वयंअध्ययनवृत्ती’. सर्व प्रकारच्या विकास प्रक्रियांची सुरुवात या वृत्तीतूनच होत असते. म्हणून स्वयंअध्ययनवृत्ती ही स्वयंभू व उस्फूर्त असते. परावलंबी वर्तनाकडून स्वावलंबी वर्तनाकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणारी विकासप्रक्रिया म्हणजेच स्वयंअध्ययनवृत्ती. मुलांना यापुढे माहितीचे गाठोडे देऊन चालणार नाही तर त्यांना स्वतंत्र विचारशक्तीने व स्वावलंबी वृत्तीने कसे जगता येईल याचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. जास्तीतजास्त विकास घडविण्यासाठी स्वयंअध्ययनवृत्तीचा विकास हा एकच पर्याय महत्त्वाचा आहे. स्वयंअध्ययनवृत्तीची वाटचाल यशाचे शिखर गाठण्याच्या दिशेने होत असते. आपल्या सुप्त सामर्थ्याचा शोध घेता घेता आत्मप्रचीती येते त्यालाच आपण आत्मसाक्षात्कार म्हणतो. सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक विकासप्रक्रीयांची मुळ प्रेरणा म्हणजे स्वयंअध्ययनवृत्ती.

९. विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन
जुन्या व नव्या गोष्टीतील अधिक योग्य व उपयुक्त संकल्पनांचा स्वीकार करणे म्हणजे ‘विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन’. देशातील प्रत्येक नागरिकांच्या अंगी विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन प्राप्त व्हायला हवा ही काळाची गरज आहे. मुलांच्या अंगी जर विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन निर्माण झाला तर अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज उद्भवणार नाही. विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन शक्यतो वय वर्षे १३ ते २५ या वयोगटातच निर्माण होणे आवश्यक ठरते. निसर्गातील प्रत्येक वस्तूकडे व घटनेकडे पाहून कार्यकारण संबंध जोडण्याची स्वतंत्र व डोळस दृष्टी असेल तरच हा दृष्टीकोन प्राप्त होऊ शकतो. आधुनिक जगात आपले जीवन सुखी व समाधानी व्हावे या हेतूने तयार केलेली, आधुनिक जीवनपद्धतीची ही आचार संहिता होय.

१०. विधायक वृत्ती
मानवी जीवनातील विकासाच्या कोणत्याही क्षेत्रात अतिउत्कृष्टतेकडे वाटचाल करण्यास कारणीभूत ठरणारी, प्रगतीस पोषक असणारी, इतर कुणाचेही नुकसान न करणारी आणि रचनात्मक वर्तनास व कृतीस प्रेरणायुक्त ठरणारी अशी जी वृत्ती असते त्या वृत्तीस ‘विधायक वृत्ती’ म्हणतात. विकासाची उच्चतम पातळी गाठण्यास व्यक्तीच्या सामार्थ्यापेक्षा व्यक्तीची वृत्तीच अधिक दिशादर्शक ठरते. योग्य त्या फलनिष्पत्तीसाठी स्वभावाला वळण देऊन बदल घडवून आणण्याची वृत्ती म्हणजे ‘विधायक वृत्ती’ होय. आत्मज्योत पेटवून त्या प्रकाशाचा लाभ सर्व विश्वाला प्राप्त करून देण्याची किमया या वृत्तीत असते. विधायक वृत्तीमुळे सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रनिर्मिती, राष्ट्राचे संरक्षण विश्व-बंधुत्व इ. गोष्टी साध्य होतात. विधायक वृत्तीची फलनिष्पत्ती म्हणजे दिशायुक्त प्रगती. विधायक वृत्तीची उच्च अवस्था म्हणजे सहिष्णू वृत्ती. ‘हे विश्वाची माझे घर’ अशी उदात्त व व्यापक दृष्टी त्यात प्राप्त झालेली असते.

११. साहसयुक्त जबाबदारी
स्वावलंबी वृत्ती, स्वयंनिर्णयशक्ती असल्याशिवाय व्यक्ती कोणत्याही कामाची जबाबदारी घेण्याचे साहस करीत नसते. कोणत्याही कामाची जबादारी अंगावर घेऊन ती पूर्ण करण्यास व्यक्तीकडे साहस हा गुण असावा लागतो. साहसयुक्त जबाबदारी हा स्वावलंबीवृत्तीचा आविष्कार होय. पालकांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी म्हणजे मुलांना स्वावलंबी बनविणे होय. सर्व पशु-पक्षी अल्पावधीत स्वावलंबी बनतात. महत्वाकांक्षी लोक जीवनात स्वतःला पडेल ती जबाबदारी घेऊन झोकून देतात. म्हणूनच अशी माणसे जीवनात यशस्वी होतात. अत्यंत बिकट व अवघड जबाबदारी हसत हसत अंगावर घेणारी माणसे ध्येयवादी असतात. अशा व्यक्तींनाच केवळ यशसिद्धी प्राप्त होते व विजयश्री त्यांना माळ घालते. अशा व्यक्ती समाज आणि राष्ट्रासाठी मोठी जबाबदारी घेऊन प्राणांची पर्व न करता कार्य करून अजरामर कीर्ती मिळवतात.

१२. संस्कारक्षमता
संवेदिनशीलता टिकविणे यालाच संस्कार करणे असे म्हणतात. वर्तन-परिवर्तन क्षमता टिकवण्याच्या दृष्टीने वातावरण निर्मिती करणे म्हणजेच संस्कार करणे होय. मुलांच्या अंगी अशा प्रकारची संस्कारक्षमता प्राप्त होण्यासाठी जे माध्यम उपलब्ध असते त्यास संस्कारमाध्यम म्हणतात. वर्तनात अपेक्षित बदल करण्याची प्रवृत्ती म्हणजे संस्कारक्षमता. घर, शाळा व समाज वर्तनपरिवर्तन घडवितात. सुसंस्कारसंपन्नतेसाठी पुढील जीवनमुल्यांची प्रामुख्याने निवड केली जाते – प्रेम, सेवा, सहकार्य, परोपकार वृत्ती, सहानुभूती आणि नम्रता. स्थिरता म्हणजेच शांतता व एकाग्रता. म्हणून नम्रता ही दैवी गुणांची जननी होय.

१३. कार्यपद्धती
काम कोणत्या हेतूने पूर्ण केले आणि कशाप्रकारे पूर्ण केले त्या पद्धतीस ‘कार्यपद्धती’ म्हणतात. भारतीय लोकांनी पाश्चिमात्य लोकांच्या वैज्ञानिक पद्धतीचे व त्यांच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करावे असे स्वामी विवेकानंद म्हणत असत.
विचारपद्धती + वर्तनप्रकार + प्रत्यक्षकृती = कार्यपद्धती
कोणतेही काम अपूर्ण अवस्थेत न ठेवता पूर्ण करण्याची तळमळ असणे हा कार्यपद्धतीचा प्राण आहे. शास्त्रशुद्ध कार्यपद्धती असेल तरच कोणतेही उत्तम दर्जाचे कार्य होऊ शकते. उत्तम कार्यपद्धतीचा आविष्कार नवनिर्मिती व फलनिष्पत्तीचा आनंद.

१४. आत्मसंयमन
भावनांच्या आवेगाप्रमाणे वर्तनास व कृतीस नियंत्रित करून भावनांचे उदात्तीकरण घडविणारी आंतरिक विधायक वृत्ती असेल तर आत्मसंयमन येते.
भावनिक नियंत्रण + विधायक वृत्ती = आत्मसंयमन
आत्मसंयमनाला जीवनात महत्त्वाचे स्थान आहे, म्हणून भारतीय संस्कृतीत आत्मसंयमनाला शौर्य मानले आहे. प्रगतीच्या दिशेपासून मन विचलित करणाऱ्या गोष्टींवर आत्मसंयमनच नियंत्रण करू शकते. आत्मसंयमनाची उच्च पातळी म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था. या उच्च पातळीवर व्यक्तीस अध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त होऊन व्यक्ती व्यक्तिमत्त्व विकासाच्या अंतिम टप्प्यात येते. दोलायमान अवस्थेत माणसाचा तोल जाऊ न देत नियंत्रण करणारी शक्ती म्हणजे ‘आत्मसंयमन’ होय. आत्मसंयमन प्राप्त आले तर जग जिंकता येईल. विद्युतशक्तीचे रुपांतर ज्याप्रमाणे उष्णता , प्रकाश, चुंबकीय किंवा यांत्रिक या शक्तींमध्ये होते, त्याप्रमाणेच आत्मसंयमन या प्रेरणाशक्तीचे रुपांतर विविध प्रकारे आपल्या वर्तनात प्रकट होत असते. विचारांचे, आचारांचे व कृतीचे अर्थशास्त्र आत्मसंयमनात असते.

१५. एकाग्रता
आपल्या सर्व शक्तींचे केंद्रीकरण करून प्रचंड मानसिक सामर्थ्य निर्माण करता येते. मनाची अशी अवस्था प्राप्त करणे म्हणजेच ‘एकाग्रता’ होय. विकासाची अमृत संजीवनी प्राप्त करण्याचे श्रेय एकाग्रतेस जाते. यशाची रहस्ये शोधण्याचा कालावधी एकाग्रतेत असतो. व्यक्तीला आत्मप्रचीती येउन आत्मसाक्षात्कार याच कालावधीत येऊ शकतो. एकाग्रता साध्य होण्यासाठी सर्वप्रथम आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम अवस्थेत असायला हवे. ‘एकाग्रतेने सर्व सिद्धींची प्राप्ती होऊ शकते’ यापेक्षा जास्त फलनिष्पत्ती काय असू शकते ?
एडिसनच्या शोधांची किंमत अमेरिका राष्ट्राच्या अर्ध्या साधन संपत्ती एवढी मानली जाते…!! हे केवळ एकाग्रतेमुळे होऊ शकते. जसे सर्व रोगांवर एकच रामबाण औषध असावे, त्याप्रमाणेच एकाग्रतेचा उपयोग करून व्यक्ती आपल्या जीवनात असंख्य प्रसंगांना सामोरे जातांना करू शकते.

१६. कार्यक्षमता
कार्यक्षमता वाढली तरच विकासाचा वेग वाढतो हे निश्चित आहे. कार्यक्षमता वाढविणे ही काळाची गरज आहे. उपलब्ध वेळेचा, गुणवैशिष्ट्यांचा, परिश्रमाचा व पैश्याचा योग्य वापर करून आयुष्याची जास्तीत जास्त किंमत ठरविणे म्हणजेच आयुष्याची कार्यक्षमता वाढविणे होय. जिथे उत्साह असतो त्याच ठिकाणी कार्यक्षमता भेटते. आपण आपल्या विचारात, वागण्यात, व कृतीत बदल घडवून आणले तरच आपल्या कार्यक्षमतेत वाढ होते. सतत उद्योगाने माणसाची कार्यक्षमता वाढते. ज्ञानेंद्रियाचा व अवयवांचा जितका उपयोग अधिक, तितकी त्यांची कार्यक्षमता वाढतच जाते. सर्वसाधारणपणे कार्यक्षम व्यक्तींचीच ज्ञानेंद्रिये मृत्युपर्यंत कार्यक्षम असल्याची उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे अपवाद वगळता कार्यक्षम असणाऱ्या व्यक्तींची आयुष्यमर्यादा जास्त असते.

१७. शारीरिक क्षमता
आपल्या सर्व शारीरिक प्रक्रिया व संस्था या सुव्यवस्थित व कार्यक्षम राहून मानसिक प्रक्रिया सुव्यवस्थित असणे यालाच ‘शारीरिक स्वास्थ्य’ म्हणतात. शारीरिक व मानसिक कष्ट करण्याइतपत आरोग्यसंपन्न शारीरिक अवस्था असेल तरच आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले आहे असे म्हणता येईल. यासाठी शारीरिक यंत्रांचे सुसंघाटन चांगले असावे लागते. व्यक्तिमत्त्व विकासाचा मूळ आधारस्तंभ म्हणजे शारीरिक स्वास्थ्य होय. शारीरिक यंत्रणा कार्यक्षम असणेसाठी आहार, विहार, व्यायाम, झोप विश्रांती सवयी यांचा समतोल साधने आवश्यक ठरते. अनेक आजारांचे व व्याधींचे निर्मुलन योगासनांनी होऊ शकते. आरोग्याच्या उत्तम सवयी, झोप, विश्रांती, समतोल आहार इ. गोष्टींचे समतोलत्व साधने म्हणजेच शारीरिक स्वास्थ्य टिकवणे होय.

१८. मानसिक आरोग्य
मानसिक यंत्रणा सुव्यवस्थित व कार्यक्षम असेल तरच मानसिक आरोग्य चांगले राहते. धनसंपत्ती किंवा राजवैभवापेक्षा मौल्यवान काय असू शकते तर उच्च मानसिक सामर्थ्य. उच्च मानसिक सामर्थ्याचे वैभव हे मासिक आरोग्याचे फळ होय. अतिउत्तम मानसिक सामर्थ्य असल्याशिवाय सर्जनशील विचारांचा जन्म होत नसतो. मानसिक आरोग्याची फलनिष्पत्ती म्हणजे व्यक्तिमत्त्वाचे समतोलत्व. उत्तम मानसिक आरोग्य म्हनज सर्वश्रेष्ठ सौदर्य होय. मनाची एकाग्रता, चित्ताची प्रसन्नता, कल्पनांची प्रगल्भता, अभिव्यक्तीची विविधता, सर्जनशीलतेची मौलिकता, अंतःकरणाची शुद्धता, विचारांची व्यापकता आणि वृत्तींची स्थितप्रज्ञ अवस्था इ. मानसिक आरोग्याच्या देणग्या व्यक्तिमत्त्वास अलौकिक सौदर्य बहाल करतात यापेक्षा दुसरे सौदर्याचे वैभव काय असू शकते ?

१९. समायोजन क्षमता
सामाजिक जीवनाची व्याप्ती राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊ शकते. परीपाक्वतेनुसार अधिक यशस्वी व समृद्ध सामाजिक संबंध जोडण्याचे तंत्र अवगत असेल तरच आपणास आपले सामाजिक जीवन अधिक व्यापक करता येईल. सामाजिक संबंध जोडण्याची, विकसित करण्याची व टिकवण्याची जितकी पात्रता व्यक्तीकडे अधिक तितकी समायोजन क्षमता त्या व्यक्तीकडे असते. समायोजन क्षमता अतिउत्तम असल्याशिवाय नेतृत्वाला आविष्कार व अधिकार प्राप्त होत नाही. साहिश्नुवृत्ती असणे म्हणजेच समायोजन क्षमतेचा कळस होय. प्रेम व सहानुभूती व्यक्त केल्यास समायोजन क्षमता असंख्य पतीने वाढते.

२०. भावनिक सुरक्षितता
भावनिक जबाबदारी आविष्कारांना जाणीवपूर्वक वळण देणे म्हणजेच भावनिक विकास. भावनिक व नैतिक विकास घडवण्याची जबाबदारी आई – वडीलच अधिक घेऊ शकतात. आई- वडिलांची मुलांच्या बाबतीत असणारी वागणूक ही सहानुभूतीपूर्वक, सहनशील व समजुतदारपणाची असेल तर मुलांचा भावनिक विकास अतिशय चांगला घडू शकतो. पावसाला तर आपण थांबवू शकत नाही, कुणी किती भिजायचे किंवा भिजायचे नाही हे ज्याने त्याने ठरवायचे असते. पालक फार तर मुलांना छत्री देऊ शकतात आणि ही छत्री प्रेमाची, आपुलकीची, समजूतदारपणाची, सहानुभूतीची व सुरक्षितपणाची असावी लागते; यालाच ‘भावनिक सुरक्षितता’ म्हणतात. स्वतःच्या सामर्थ्यावर ज्यांची अढळ श्रद्धा आहे अशा व्यक्ती नेहमीच भावनिक दृष्ट्या सुरक्षित असतात. श्रद्धा ही सर्वश्रेष्ठ आधार देणारी शक्ती असते. माणसाचे इतर आधार नष्ट झाले तरी श्रद्धेच्या आधारावर असणाऱ्या व्यक्ती भावनिकदृष्ट्या सुरक्षित असतात. श्रद्धेचे सामर्थ्य व्यक्तीबरोबर सदैव असते.

मुलांच्या समस्यांवर समुपदेशन:
डॉ. वाय. के. शिंदे यांनी आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळी वय, परिस्थिती व स्तर यांतून आलेल्या असंख्य मुलामुलींच्या मानसिक, भावनिक इ. समस्या सोडविल्या आहेत. त्यांनी मुलांच्या विकासाचे शास्त्र, मानसशास्त्र, शिक्षण, पालक इ. विषयांत सर्वंकष अभ्यास व भरीव कार्य केले आहे. त्यामुळे मुलांच्या समस्यांबाबत सर्वांगीण ज्ञान व व्यापक अनुभव त्यांच्याकडे आहे.

व्यक्तिमत्व संजीवनी ग्रंथ:
व्यक्तीच्या परिपूर्ण व्यक्तिमत्वासाठी वरील गुणांची आवश्यकता आहे. हे सर्व गुणवैशिष्ट्ये ‘व्यक्तिमत्व संजीवनी’ ग्रंथात सुंदर रीत्या मांडले आहेत. ह्या ग्रंथाबद्दल जाणून घेण्यासाठी पहा
ग्रंथ संपदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *