डॉ वाय के शिंदे – परिचय

dr_ykshinde

डॉ. वाय. के. शिंदे आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन कार्याने ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. प्रचलित शिक्षणात केवळ वाचन, लेखन आणि स्मरण या मर्यादित क्षमतांवर भर दिला आहे. ही मेकॉलेप्रणीत परीक्षाकेंद्रित (Exam-oriented) शिक्षणपद्धती हीच सर्व समस्यांचे मूळ आहे. त्यातूनच नवीन पिढी घडत नसल्यामुळे तेच इतर मानसिक, कौटुंबिक व सामाजिक इ. समस्यांचे कारण ठरत आहे, हा मुलभूत विचार त्यांनी केला. त्यामुळे उच्च शासकीय पदावरील (SSC board) नोकरी सोडून त्यांनी स्वतंत्र संशोधन संस्था काढली. ही संस्था केवळ देणग्या आणि स्वबळावर शासकीय अनुदानाशिवाय उभी केली. केवळ संशोधन न करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. लेखन, प्रकाशन, मार्गदर्शन, समुपदेशन, भाषण, प्रबोधन, कृती कार्यक्रम इ. अनेक मार्गाने ते सतत कार्यरत राहिले. त्यांच्या ध्येयनिष्ठ व प्रेरणादायी आयुष्यावर पुस्तकच लिहिता येईल पण या लेखात त्यांच्या संशोधन कार्याचा थोडक्यात परिचय दिला आहे.
“मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी केलेली गुंतवणूक हीच सर्वश्रेष्ठ गुंतवणूक होय.” हा मौल्यवान विचार त्यांनी मांडला. शिक्षण म्हणजे केवळ मुलांच्या परीक्षा घेणारी यंत्रणा नव्हे. त्यांचे ‘व्यक्तिमत्त्व’ कसे घडविता येईल व हे शिक्षण त्यांना आयुष्यात कसे उपयोगी पडेल हे फार महत्वाचे आहे. या विचारातून त्यांनी ‘व्यक्तिमत्त्व संजीवनी’ प्रकल्पाची उभारणी केले. यामध्ये त्यांनी ‘व्यक्तिमत्त्व मापन कसोटी’ हा शिक्षणातील क्रांतिकारक शोध लावला. यांत व्यक्तिमत्त्वाच्या २० गुणवैशिष्ट्यांची अचूक मापन केले जाते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, इतर विविध क्षेत्रातील लोक यांनी ती दिली आहे. त्याची अचूकता (Accuracy) आणि उपयुक्तता (Usefulness) त्यांनी मान्य केले आहे. हे गुण विकसित करण्याचाही कार्यक्रम यांत आहे.
“योग्य वयात विकासाची योग्य संधी उपलब्ध करून देणे हाच मुलांच्या विकासाचा मंत्र आहे.” हे सूत्र त्यांनी दिले. आजच्या धकाधकीच्या जीवनात पालक आपल्या मुलांसाठी अखंड कष्ट उपसत असतात. पण केवळ पैसा व साधनांची रेलचेल यांमुळे विकास होत नाही. प्रत्येक पालक मुलांचे हितच पाहत असतात, पण केवळ विकासाच्या अज्ञानामुळे ते मुलांच्याबाबतीत मोठ्या चुका करतात. त्यांच्याकडे मुलांच्या समस्या घेऊन असंख्य पालक येत असत. पण बरेचदा ते या आलेल्या पालकांचेच समुपदेशन (Counselling) करत असत. पालकांना मार्गदर्शन करणारी ‘पालक संजीवनी ‘ ची निर्मिती त्यांनी केली.
आज एकूण शिक्षण व्यवस्थेत व समाजात शिक्षकाचे स्थान फारसे मानाचे राहिले नाही. म्हणजेच ‘शिक्षकी’ पेशा मूल्यवान (Noble profession) राहिला नाही. एकूण शिक्षणाचे व्यापारीकरण झाले आणि ‘विद्यार्थी घडविणे’ या आपल्या मुख्य उद्दिष्टापासून शिक्षक बाजूला गेला. या दोन मुख्य कारणांमुळे ही अवस्था प्राप्त झाली आहे. ह्या परिस्थितीत एकूण शिक्षणाच्या, शिक्षण व्यवस्थेच्या समस्या व त्यांची कारणे आणि यांतून शिक्षकांची नेमकी भूमिका याबाबद्द्लाचे संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी ‘शिक्षक संजीवनी’ मध्ये केले.
यानंतर समाजातील मान्यवरांनी व लोकांनी त्यांना समाजासाठी मार्गदर्शक असे काही लिहिण्यास सुचविले. पण समाज हा प्रत्येक व्यक्तीपासून बनला आहे, त्यामुळे व्यक्तीपरिवर्तनाची गरज त्यांनी ओळखली. व्यक्तीच्या बहुतेक सर्व समस्यांचे किंवा प्रगतीचेही खरे मूळ हे तिच्या मनाचा कसा व किती विकास झाला आहे यावरच अवलंबून असते. मनाचे स्वरूप, त्याच्या निरनिराळ्या अवस्था, समस्या व त्यावरील उपाय, मनाचे उच्च अवस्थेकडे विकास अशा सर्व गोष्टींचे सोप्या शब्दात मार्गदर्शन ‘मन संजीवनी’ या पुस्तकात मांडले आहे. हे पुस्तक काही दिवसात प्रकाशित होत आहे.
अलीकडे शिक्षणात काही क्रांतिकारक निर्णय झाले आहेत, जे शिक्षणाला परीक्षाकेंद्रित (Exam-oriented) कडून विद्यार्थीकेंद्रित (Student-orient) करण्याचा प्रयत्न करतील. जसे की अभ्यासक्रमात व्यक्तिमत्त्व विकास, मूल्यशिक्षण यांचा समावेश , दहावी पर्यंत मार्क्स न देणे, गुणवत्ता यादी बंद करणे इ. पण ह्या सर्व गोष्टी फार पूर्वीच त्यांनी अनेक जाहीर सभा व अधिवेशनातून आग्रहाने मांडल्या होत्या, हे शिक्षणक्षेत्राशी संबंधित लोकांना माहित आहे. त्यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्रातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनीही केला. महाराष्ट्राचे द्रष्टे शिक्षणमंत्री कै. श्री. मधुकरराव चौधरी, माजी शिक्षण आयुक्त वि. वि. चिपळूणकर यांनी खास दाखल घेऊन आणि प्रत्यक्ष अनेक वेळा भेट देऊन या कार्याचा गौरव केला. समाजातील शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक, राजकीय इ. अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळीही त्यांनी जोडली आणि या सर्वांनी त्यांना नेहमी विधायक पाठींबा दिला. पण पुरस्कार, गौरव यांपेक्षा हे मुलभूत संशोधनाचे ज्ञान समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत जाईल यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतले. या कार्यात ते शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. पोसेवाडी सारख्या ग्रामीण भागात हे कार्य शासकीय अनुदानाशिवाय केवळ स्वबळावर अजूनही चालू आहे. आता हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांचे कुटुंबीय व जवळच्या व्यक्ती करीत आहे. त्यांचे मौल्यवान संशोधन व ज्ञान लोकांपर्यंत पोहोचणे व ते कार्य पुढे चालू ठेवणे हीच या शिक्षण क्रांतीकारकाला खरी श्रद्धांजली ठरेल !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *